Asia Cup 2025 आधी टीम इंडियाचा कॅप्टन फिक्स;शुबमनला मोठा झटका! सूर्याच्या फिटनेस टेस्टचा असा निकाल
Asia Cup 2025 Team India Captain : आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची येत्या काही दिवसात घोषणा केली जाणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार कोण असणार? हे जवळपास निश्चित झालं आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेआधी भारतीय संघाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व शुबमन गिल आणि सूर्यकुमार या दोघांपैकी कोण करणार? असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत होता. टी 20 टीम इंडियाचा नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या फिटनेसमुळे तो नेतृत्व करणार की नाही? याबाबत शंका होती. त्यामुळे कसोटी कर्णधार शुबमन गिल याला नेतृत्व मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एका निकालामुळे आता सर्व चित्र स्पष्ट झालं आहे.
टीम इंडिया नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याच नेतृत्वात आशिय कप स्पर्धेत खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव याला एनसीएकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.सोपं भाषेत सांगायचं झाल्यास सूर्या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. मात्र बीसीसीआयकडून सूर्या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
सूर्याने दुखापतीनंतर बंगळुतील एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकडेमीत फिटनेसवर मेहनत घेतली. सूर्याने एनसीएत फिट असल्याचं टेस्टद्वारे सिद्ध केलं. त्यानंतर एनसीएकडून सूर्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला. नियमानुसार, खेळाडूंना दुखापतीनंतर झाल्यावर एनसीएत फिटनेस सिद्ध करावी लागते. त्यानंतर एनसीएकडून एनओसी दिली जाते.
सूर्यावर काही आठवड्यांआधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सूर्या शस्त्रक्रियेनंतर एनसीएत रिहॅब करत होता. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, सूर्या बंगळुरुत होता.
सूर्या फिट झाल्याने टीम इंडियासह बीसीसीआय निवड समिताीला मोठा दिलासा मिळाला आहे. आशिया कप स्पर्धेला 19 ऑगस्टपर्यंत भारतीय संघाची घोषणा होणं अपेक्षित आहे. अशात सूर्या फिट असल्याचं स्पष्ट झाल्याने निवड समितीची डोकेदुखी कमी झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव फिट झाल्याने तो निवड समितीच्या बैठकीत उपस्थित असणार आहे.
आशिया कप 2025 बाबत महत्त्वाची माहिती
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेत यंदा एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये करण्यात आलं आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे.
