शेवटची संधी..! वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना या खेळाडूसाठी महत्त्वाचा, नाही तर…
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. हा सामना जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न असेल. पण असं असताना एका खेळाडूचं करिअर या सामन्यावर अवलंबून असणार आहे. त्याच्यासाठी हा सामना शेवटची संधी ठरू शकतो.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकाल तर विजयी टक्केवारीत वाढ होणार आहे. त्यामुळे हा सामना काहीही करून जिंकणं भाग आहे. त्यामुळे अंतिम फेरीचं गणित सोपं होणार आहे. दुसरीकडे, हा सामना एका खेळाडूसाठी शेवटची संधी ठरू शकते. त्यामुळे करिअर वाचवणं आता त्या खेळाडूच्या हातात आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून साई सुदर्शन आहे. त्याला कसोटी मालिकेत तिसर्या स्थानावर संधी मिळाली. पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फार काही करू शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही फेल गेला आहे. त्यामुळे कसोटी संघातून आऊट होण्याची वेळ आली आहे.
साई सुदर्शनवर करिअर वाचवण्याचा दबाव
साई सुदर्शनला कसोटी संघात जागा पक्की करायची तर त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात काहीही करून खेळावं लागणार आहे. कारण या सामन्यात फलंदाजीत फेल गेला तर पुन्हा संधी मिळणं कठीण आहे. त्यामुळे पुढच्या मालिकेत संधी हवी असल्यास मोठी खेळी करावी लागेल. दुसरीकडे, त्याच्या जागी खेळण्यासाठी चार खेळाडू रांगेत उभे आहेत. त्यामुळे साई सुदर्शनला चूक महागात पडू शकते. अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरैल, रजत पाटीदार आणि देवदत्त पडिकल ही चार नावं शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत साई सुदर्शनकडे चांगली कामगिरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
साई सुदर्शनने जून-जुलैमध्ये टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी संघात पदार्पण केलं होतं. साई सुदर्शनने खेळलेल्या 7 डावांमध्ये 21च्या सरासरीने फक्त 147 धावा केल्या. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन फक्त 7 धावांवर बाद झाला. आता वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली कसोटीच्या आठव्या डावात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. याआधी करूण नायर कसोटी मालिकेत फेल गेला होता. त्यामुळे त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे.
