रोहित शर्मा आणि विराट कोहलीने माझ्या जवळ येऊन बोलावं! गौतम गंभीर असं म्हणाला?
गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यापासून रोज काही ना काही वावड्या उठत आहेत. रांची वनडे सामन्यानंतर पुन्हा एकदा जुन्या कढीला ऊत आला आहे. रिपोर्टनुसार, विराट-रोहित आणि गौतम गंभीर यांच्यात संवादाचा अभाव दिसून येत आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय सुरू आहे.

दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 2-0 पराभव केल्यानंतर गौतम गंभीर टीकेचा धनी ठरला आहे. सर्व बाजूने गौतम गंभीरवर टीका होत आहे. मात्र गौतम गंभीर आपल्यावर होत असलेल्या टीकांना सामोरं जात आहे. एक वाद संपत नाही तोच गौतम गंभीरच्या मागे दुसरा वाद उभा राहिला आहे. रांची वनडे सामन्यात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला 17 धावांनी पराभूत केलं. पण असं असूनही टीम इंडियाच्या गोटात विचित्र वातावरण असल्याचा चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहली-रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात संवाद नसल्याचं बोललं जात आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशी नाराज आहेत. त्यामुळे टीम इंडियात तणावाचं वातावरण असल्याचं चित्र आहे. सरावावरून रोहित-विराट आणि गंभीर यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. काही वरिष्ठ क्रीडा पत्रकार असे दावे करत आहेत. मात्र त्याबाबत खरं काय ते माहिती नाही.
रोहित-विराट आणि गंभीर यांच्यात काय झालं?
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही रांचीत लवकर पोहोचले होते. त्यात त्यांना वेगळा सराव करायचा होता, असा दावा केला जात आहे. जेव्हा ही बाब गौतम गंभीरच्या कानावर पडली तेव्हा त्याने त्या दोघांनी माझ्याशी येऊन चर्चा चर्चा असं सांगितलं. पण या दाव्यात खरंच तथ्य असेल तर टीम इंडियासाठी ही बाब काही चांगली नाही. रांची वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, गौतम गंभीरचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असं असताना तिघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात आहे. सामन्यानंतर गौतम गंभीर आणि रोहित शर्मा खूप वेळ चर्चा करताना दिसले.
हॉटेलमध्ये नेमकं काय झालं?
रांची वनडे सामना जिंकल्यानंतर पूर्ण टीम हॉटेलमध्ये केक कापत होती. तेव्हा विराट कोहली सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. दुसरीकडे, गौतम गंभीर रोहित शर्माशी चर्चा करताना दिसला. रोहित शर्मा यावेळी खूपच सीरियस मूडमध्ये होता. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काही तरी झाल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्ायत किती तथ्य आहे हे येणार काळच सांगेल. सध्यातरी या चर्चांचं पेव फुटलं आहे. दावेप्रतिदावे केले जात आहे. पण खरंच असं घडत असेल तर टीम इंडियातील इतर खेळाडूंवर त्याचा वाईट प्रभाव पडेल. सध्या टीम इंडिया रायपूरला पोहोचली असून दुसरा वनडे सामना 3 डिसेंबरला खेळला जाणार आहे.
