Vaibhav Suryavanshi : 11 बॉलमध्ये 51 धावा, कॅप्टन वैभव सूर्यवंशीचं फायर अर्धशतक, नववर्षात धमाका
Vaibhav Suryavanshi Fifty : वैभव सूर्यवंशी याने कर्णधार म्हणून दुसऱ्याच यूथ वनडे मॅचमध्ये धमाका केला आहे. वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तोडफोड अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने या अर्धशतकी खेळीतील 51 पैकी 48 धावा या षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या.

अंडर 19 टीम इंडियाचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधार म्हणून पहिल्या यूथ वनडे मॅचमध्ये अपयशी ठरला. वैभवने भारताला कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकून दिला. मात्र वैभवला मोठी खेळी करता आली नाही. मात्र वैभवने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत धमाका केला आहे. वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने या अर्धशतकी खेळीदरम्यान 8 षटकार झळकावले. तसेच वैभवने विजयी धावांचा पाठलाग करताना एरॉन जॉर्ज याच्यासह भारताला दमदार अर्धशतकी सलामी भागीदारी करुन दिली.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेला 250 पार पोहचता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 49.3 ओव्हरमध्ये 245 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर एरॉन जॉर्ज आणि वैभव या सलामी जोडीने 246 धावांचा पाठलाग करताना वादळी सुरुवात केली.
वैभवची चाबूक बॅटिंग
वैभवने पहिल्याच ओव्हरपासून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. तर एरॉनने दुसऱ्या बाजूने वैभवला चांगली साथ दिली. एरॉनने वैभवला एकेरी धाव घेत सातत्याने स्ट्राईक दिली. वैभवने या संधीचा फायदा घेत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ही जोडी चांगलीच जमली. वैभव आणि एरॉनने 6 ओव्हरमध्ये 67 रन्स जोडल्या. मात्र एरॉन सातव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. एरॉनने 19 बॉलमध्ये 20 रन्स केल्या.
एरॉननंतर मैदानात आलेल्या वेदांत त्रिवेदी याच्यासह वैभवने धावफळक धावता ठेवला. वैभव सूर्यवंशी याने आठव्या ओव्हरमध्ये 2026 वर्षातील आणि या मालिकेतील पहिलंवहिलं वादळी अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अवघ्या 19 बॉलमध्ये तब्बल 8 षटकरांच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं. वैभव अशाप्रकारे 51 धावांपर्यंत पोहचला. वैभवने 268 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावलं. वैभवने या अर्धशतकी खेळीत फक्त 3 धावा या धावून घेतल्या.तर उर्वरित धावा या 48 धावा या षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या.
वैभवचा अर्धशतकानंतरही तडाखा सुरुच होता. त्यामुळे वैभव अंडर 19 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार, असंच वाटत होतं. मात्र वैभव अर्धशतकानंतर काही धावा जोडून आऊट झाला. वैभवने 24 बॉलमध्ये 283.33 च्या सुपर स्ट्राईक रेटने 68 रन्स केल्या. वैभवने या खेळीत 10 षटकार आणि 1 चौकार लगावला. सोप्या भाषेत सांगायचं तर वैभवने या 68 धावांच्या खेळीत 64 धावा या फक्त 11 चेंडूत केल्या. तर 4 धावा या धावून घेतल्या.
