Under 19 World Cup 2026: दक्षिण अफ्रिकेचा 329 धावांनी विजय, या सामन्यात झालं तरी काय?
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारणंही तसंच आहे. 329 धावांनी विजय म्हणजे नेमकं झालं तरी काय? चला जाणून घेऊयात

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या गट ड मध्ये दक्षिण अफ्रिका आणि तांझानिया यांच्यात सामना पार पडला. हा सामना एकतर्फी झाला. कारण दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात 329 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल तांझानियाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय तांझानिया घातक ठरला. 93 धावांवर 2 विकेट पडल्यानंतर धावांची त्सुनामी आली. कर्णधार मुहम्मद बुलबुलिया आणि जेसन रोल्स यांनी वादळी खेळी केली. समोर जो गोलंदाज येईल त्याला सळो की पळो करून सोडलं. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली. मुहम्मद बुलबुलिया याने 108 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 108 धावा केल्या. तर जेसन रोल्स हा नाबाद राहिला. त्याने 101 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 125 धावांची खेळी केली. पॉल जेम्सने 18 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकार मारत 46 धावांची खेळी केली. यासह तांझानियासमोर विजयासाठी 397 धावांचं आव्हान ठेवलं.
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी धावांचा पाठलाग करताना तांझानियाने अवघ्या 68 धावांवर नांगी टाकली. फक्त तीनच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. पण त्यांची धावसंख्याही 20 च्या पुढे नव्हती. दर्पण जोबनपुत्र 2, डिलन ठकरार 1, करीम रशिदी किसेतो 6, ऑगस्टिनो मेया म्वामेले 0, लक्ष बकरानिया 7, सिम्बा म्बाकी 17, अॅक्रे पास्कल ह्यूगो 12*, रेमंड फ्रान्सिस 10, खालिदी जुमा 0, अल्फ्रेड डॅनियल 1, अयान आशिक शरीफ 0 असे खेळले. दक्षिण अफ्रिकेकडून बुयांडा माजोलाने 2, जेसन रोल्सने 2, मायकेल क्रुइस्कॅम्पने 1, बॅंडिले म्बाथा 1, कॉर्न बोथा 1 अशा विकेट मिळाल्या.
दक्षिण अफ्रिकेने इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला असला तरी पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले नाहीत. पुढचा सामना दक्षिण अफ्रिकेला काहीही करून जिंकावा लागणार आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकले असून पुढच्या फेरीत पोहोचले आहे. दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिजला पुढच्या फेरीची संधी आहे. 22 जानेवारील हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यातील विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर टांझानियाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेतील शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना जिंकला तरी काही उपयोग होणार नाही.
