टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांग्लादेशचे सामने कुठे होणार? बीसीसीआयने एका वाक्यात विषय संपवला
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतात सामने न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. यासाठी आयसीसीकडे निवेदनही केलं आहे. या संदर्भात बीसीसीआयला विचारलं असता त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवला. नेमकं काय झालं ते समजून घ्या..

आयपीएल 2026 स्पर्धेतून मुस्ताफिझुर रहमानला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर ठिणगी पडली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबतच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकप सर्व सामने श्रीलंकेत व्हावेत यासाठी आग्रह धरला आहे. आयसीसीने त्यांना अजूनही ठोस असं काही सांगितलं नाही. स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ठिकाण बदलणं आणि सामन्यांचं नियोजन करणं वाटतं तितकं सोपं नाही. तरीही बांग्लादेश क्रिकेट बोर्ड वेगवेगळी विधानं करून संभ्रम पसरवण्याचं काम करत आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना बीसीसीआयने एका वाक्यात हा विषय संपवला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांच्या वक्तव्याने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला धक्का बसणार यात काही शंका नाही.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, ‘बांगलादेशचे सामने चेन्नई किंवा इतरत शिफ्ट करण्यासाठी बीसीसीआयला कोणतीच माहिती मिळाली नाही. हे सर्व नियंत्रणाच्या बाहेर आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमधील हे प्रकरण आहे. कारण आयसीसी ही गव्हर्निंग बॉडी आहे. जर आयसीसीने जागा बदलण्याचा निर्णय घेतला तर यजमान म्हणून आम्ही योग्य ते पाऊल उचलू. पण सध्या तरी आम्हाला अशी कोणती माहिती मिळालेली नाही.’ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने दावा केला की, टीमला भारतात खेळण्यासाठी सुरक्षित जागा नाही. त्यामुळे भारतात टी20 वर्ल्डकप खेळू इच्छित नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संधीचा फायदा उचलत आयसीसीला ऑफर दिली की, बांगलादेशचे सामने होस्ट करण्यास तयार आहोत. पण या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कुरापती करण्याची संधी सोडत नाही. असं असेल तर ते सामने बांगलादेशमध्येच घेता येतील.पण आयसीसीने सध्या या प्रकरणावर काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे. स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना जर बांगलादेशचं म्हणणं ऐकलं नाही आणि भारतात खेळण्यास भाग पाडलं तर गडबड होऊ शकते. बांगलादेशने नकार दिला तर स्कॉटलँडला संधी मिळू शकते.
