68 षटकांपर्यंत गोलंदाजी न देण्याचं कारण काय? शुबमन गिल खरंच विसरला की…! वॉशिंग्टन सुंदरने केला खुलासा
मँचेस्टर कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरची अष्टपैलू खेळी फायद्याची ठरली. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला हा सामना ड्रॉ करण्यात हातभार लागला. पण त्याला 68 षटकापर्यंत गोलंदाजीच दिली नव्हती. असं का झालं त्याबाबत वॉशिंग्टन सुंदरने खुलासा केला आहे.

मँचेस्टर कसोटी सामना इंग्लंड सहज जिंकेल अशीच स्थिती होती. पण भारतीय फलंदाजांनी दोन विकेट शून्यावर बाद झाल्यानंतर झुंजार खेळी केली. दोन दिवसातील पाच सत्रात फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला. या सामन्यात शुबमन गिल आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त खेळी केली. या दोघांनी शतकी खेळी केल्याने इंग्लंडचं विजयाचं स्वप्न भंगलं. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलचं कर्णधारपद आणि त्याच्या निर्णयाची चर्चा होत आहे. पण एका निर्णयामुळे क्रीडारसिकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. मँचेस्टर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचे फलंदाज वेगाने धावा करत होते. तेव्हा भारतीय कर्णधार शुबमन गिलने वॉशिंग्टन सुंदरला 68व्या षटकापर्यंत गोलंदाजी का दिली नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमी वारंवार विचारत आहेत. आता या प्रश्नावर वॉशिंग्टन सुंदरने उत्तर दिलं आहे.
ब्रॉडकास्टरने विचारलं की कर्णधार तुला पहिल्या डावात गोलंदाजी द्यायला विसरला होता का? त्यावर वॉशिंग्टन सुंदरने उत्तर दिलं की, ‘मी याबाबत कोणतीही हेडलाईन देऊ इच्छित नाही.’ वॉशिंग्टन सुंदरचं म्हणणं ऐकून नासिर हुसैन आणि स्टूअर्ट ब्रॉड यांना हसू आलं. यानंतर ब्रॉडकास्टरने विचारलं की, तु गिलकडे पाहीलं पाहीजे होतं आणि गोलंदाजीचं एक्शन करायला होती? वॉशिंग्टन सुंदरने याचं उत्तर देताना सांगितलं की, मी क्षेत्ररक्षण करताना बहुतेक वेळा स्क्वेअरला उभा असतो आणि मला विश्वास आहे की आम्ही एकमेकांना क्रॉस करतो. पण संघाला जे हवं आहे तेच मी देऊ इच्छितो.
भारताचे गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी सांगितलं की, ‘शुबमन गिलला वेगवान गोलंदाजीचे पर्याय जास्त काळ टिकवायचे होते. कारण पहिल्या दोन दिवसात चेंडू चांगला स्विंग होत होता. आम्हाला फिरकी गोलंदाजांना संधी द्यायची होती. पण वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. सुंदरने आमच्याासठी खूपच चांगले काम केले आहे.’ वॉशिंग्टन सुंदरने तीन सामन्यात 51.25 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. तसेच तीन सामन्यात 35.86 सरासरीने सात विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे पाचव्या सामन्यातही त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत.
