अशी कशी ही किळसवाणी प्रथा? बुटामध्ये दारु टाकून खेळाडू ती का पितात? ही विचित्र प्रकार कसा सुरु झाला
Shoey Tradition: अनेक खेळाडू जल्लोषात बुटात दारु टाकून ती रिचवतात. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर असाच प्रकार केला होता. आपल्याकडं हा प्रकार अत्यंत किळसवाणा वाटतो. पण ही विचित्र प्रथा कशी सुरू झाली?

Strange Sports Celebrations: तुम्हाला आठवत असेल की, 2021 मध्ये न्युझिलंडचा पराभव केल्यानंतर T20 विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष दिसला. ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी एक अजब प्रकार त्यावेळी केला. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस सारख्या खेळाडूंनी त्यांच्या पायातील बूट काढला आणि त्यात दारु ओतली. ती दारु ते पिले. गेल्या वर्षी जून महिन्यात ऑस्ट्रेलियाचे खासदार कायल मॅकगिल यांनी सुद्धा संसदेतील त्यांच्या अखेरच्या दिवशी असेच काही तरी केले होते. तेव्हा उपस्थित खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. आपल्याकडे हा प्रकार पाहून अनेकांना किळस आली. पण ही विचित्र प्रथा सुरु कशी झाली?
बुटात दारु टाकून ती का पितात खेळाडू?
जेव्हा परदेशी खेळाडू असा काही प्रकार करतात, तेव्हा आपल्याला हा प्रकार किळसवाणा वाटतो. पण ही एक प्रथा आहे. तिला ‘शूई’ (Shoey) असं म्हटलं जातं. शूईचा अर्थच बुटात दारु टाकून ती पिणं असा आहे. यामध्ये बिअर अथवा शॅम्पेनचा वापर खासकरून होतो.ऑस्ट्रेलियात हा प्रकार विजय, समारोप वा इतर काही खास कार्यक्रमासाठी करण्यात येतो. विशेष म्हणजे पायातून बूट काढण्यात येतो. त्यात बिअर अथवा शॅम्पेन टाकण्यात येते. तो बूट तोंडाला लावून ती बिअर पिण्यात येते आणि पुन्हा बूट पायात घातला जातो. हा सर्वच प्रकार अनेकांसाठी किळसवाणा आहे. पण ही प्रथा आहे.
शुईची सुरुवात कधी झाली?
शुईला जगभरात लोकप्रिय करण्याची कामगिरी ऑस्ट्रेलिया फॉर्म्युला -1 ड्रायव्हर डॅनियल रिकियार्डो याच्याकडे जातो. वर्ष 2016 मध्ये जर्मन ग्रां प्री ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने बुटात टाकून शॅम्पेन पिली होती. तेव्हापासून ही स्टाईल सर्वत्र व्हायरल झाली. त्यानंतर अनेक पार्ट्या, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हाच ट्रेंड दिसला. जिमी फॉलन, ह्यू ग्रांट, पॅट्रिक स्टीवर्ट, जेरार्ड बटलर यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी अशाच प्रकारे शॅम्पेन रिचवली.
हा प्रकार आरोग्यासाठी खरंच चांगला?
मेलबर्नमधील मोनाश विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. एंटोन पेलेग यांच्या मते जर ते बूट अधिक खराब नसतील आणि त्यात घाम आणि धूळ नसेल तर मग आरोग्यासाठी ही बाब तितकी धोकादायक नाही. पण बूट खराब असतील, अधिक वापरलेले असतील तर असा प्रकार मूर्खपणाच ठरतो. त्यांच्या मते शॅम्पेन अथवा बिअर पिण्यासाठी लोक ग्लासचा वापर करतात आणि तीच योग्य पद्धत आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक लोकांना सुद्धा हा प्रकार किळसवाणा वाटतो.
