WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर, वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देताच इंग्लंडला फायदा
इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. या मालिका विजयामुळे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबर फायदा झाला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठीची चुरस वाढणार हे स्पष्ट झालं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना जून 2025 मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार मानला जात आहे. सध्याच्या गुणतालिकेत टीम इंडिया पहिल्या स्थानावर, तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. भारताची विजयी टक्केवारी ही 68.52 इतकी असून पहिल्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62.50 असून दुसऱ्या स्थानावर आहे. पण हे स्थान कायम ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. कारण प्रत्येक मालिकेनंतर गुणतालिकेत उलटफेर होताना दिसत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 3-0 ने जिंकली. त्यामुळे त्यांच्या विजयी टक्केवारीवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. इंग्लंडने नवव्या स्थानावर थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेल्या संघात फारसा काही फरक नाही. त्यामुळे पुढच्या काही कसोटी मालिकांनंतर यात आणखी बदल होईल यात शंका नाही.
इंग्लंडने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला असून विजयी टक्केवारी 36.54 इतकी आहे. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या मालिकेत स्लो ओव्हर रेटचा फटका बसला होता. त्यामुळे विजयी टक्केवारीत गुण कापण्यात आले होते. त्यामुळे पुढचं गणित किचकट झालं होतं. पण इंग्लंडने आता जबरदस्त कमबॅक केलं असून नवव्या स्थानावरून सहावं स्थान गाठलं आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजचं नुकसान झालं असून थेट नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारत 68.52 टक्क्यांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया 62.50 टक्क्यांसह दुसऱ्या, न्यूझीलंड 50 टक्क्यांसह तिसऱ्या, श्रीलंका 50 टक्क्यांसह चौथ्या, पाकिस्तान 36.66 टक्क्यांसह पाचव्या, इंग्लंड 36.54 टक्क्यांसह सहाव्या, दक्षिण अफ्रिका 25 टक्क्यांसह सातव्या, बांग्लादेश 25 टक्क्यांसह आठव्या आणि वेस्ट इंडिज 19 टक्क्यांसह नवव्या स्थानावर आहे. भारताचे तीन कसोटी मालिका शिल्लक आहेत. यात भारत विरुद्ध बांग्लादेश दोन सामन्यांची, भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांची आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांची मालिका आहे. भारताने यापैकी दोन मालिकेत व्हाईट वॉश दिला तर अंतिम फेरीचं तिकीट पक्कं होईल.
