WPL 2026: आरसीबीला मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट! या संघात एलिमिनेटरसाठी लढत
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 12 सामन्यांचा खेळ संपला असून अंतिम फेरी आणि एलिमिनेटरची लढत सुरू झाली आहे. चला जाणून घेऊयात कसं आहे समीकरण ते...

WPL 2026 Playoff Scenario: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने शेवटच्या टप्प्यात आहे. दिल्ली कॅपिटल्स वगळता इतर चार संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने चार सामने खेळले असून गुणतालिकेत बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण 8 सामने खेळणार आहे. अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत स्थान पक्कं करणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेला संघ एलिमिनेटर फेरीत लढत देणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबी संघाचा वरचष्मा दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबीला अंतिम फेरीचं तिकीट थेट मिळण्याची शक्यता वाढली आहे. आरसीबीच्या खात्यात आता 10 गुण आहेत. उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला की आरसीबीला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण 12 गुण झाले तर इतर संघांना तिथे पोहोचणं शक्य नाही.
या तीन संघात एलिमिनेटरसाठी लढत
मुंबई इंडियन्स, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या तीन संघाच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहे. फक्त नेट रनरेटच्या हिशेबाने संघ गुणतालिकेत वर खाली आहे. मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट हा +0.151 असल्याने दुसऱ्या स्थानी, युपी वॉरियर्सचा नेट रनरेट हा -0.483 म्हणून तिसऱ्या स्थानी, तर गुजरात जायंट्सचा नेट रनरेट हा -0.864 असल्याने चौथ्या स्थानावर आहे. या तीन संघापैकी फक्त मुंबईचा नेट रनरेट हा धन आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने तीन पैकी जास्तीत जास्त सामने जिंकले तर एलिमिनेटर फेरीत स्थान पक्कं करेल.
दिल्ली कॅपिटल्स अजूनही शर्यतीत
दिल्ली कॅपिटल्सने 4 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे खात्यात 2 गुण असून नेट रनरेट हा -0.86 आहे. पण या स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सचं स्थान अजूनही आहे. कारण चार पैकी चार सामन्यात विजय मिळवला तर दिल्ली कॅपिटल्सला एलिमिनेटरचं तिकीट मिळू शकते. चार पैकी एक सामना गमावला तरी गणित जर तर वर जुळून येऊ शकते. पण वरच्या संघात तशी स्थिती आली तर संधी मिळू शकते.
