400 पेक्षा अधिक कसोटी धावा करणारे पहिले भारतीय सलामीवीर माधव आपटे यांचं निधन

1952 मध्ये पाकिस्तान विरोधात माधव आपटेंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पाच महिन्यांच्या कालावधीत ते सात कसोटी सामने खेळले.

400 पेक्षा अधिक कसोटी धावा करणारे पहिले भारतीय सलामीवीर माधव आपटे यांचं निधन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीवीर माधव आपटे यांचं निधन (Cricketer Madhav Apte Dies) झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1950 च्या दशकातील काळ आपटे यांनी सलामीवीर म्हणून गाजवला होता.

माधव आपटे यांचं आज (सोमवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन (Cricketer Madhav Apte Dies) झालं. येत्या 5 ऑक्टोबरला त्यांनी वयाची 87 वर्ष पूर्ण केली असती. वडिलांनी आयुष्याचा पुरेपूर आनंद लुटला होता, अशा भावना पुत्र वामन आपटे यांनी व्यक्त केल्या.

1952 मध्ये पाकिस्तान विरोधात आपटेंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पाच महिन्यांच्या कालावधीत ते सात कसोटी सामने खेळले. यावेळी त्यांनी एक शतक आणि तीन अर्धशतकं लगावली होती.

कसोटी मालिकेत एकूण 400 पेक्षा जास्त धावा करणारे माधव आपटे हे पहिले भारतीय सलामीवीर ठरले होते. 1953 मध्ये क्वीन्स पार्क ओव्हल कसोटीत त्यांनी 542 धावा ठोकल्या होत्या.

माधव आपटे यांनी 67 प्रथम दर्जाचे क्रिकेट सामने खेळले होते. यामध्ये मुंबईसाठी खेळलेल्या 46 आणि बंगालसाठी खेळलेल्या 3 रणजी करंडकांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी सहा शतकं आणि 16 अर्धशतकांसह तीन हजार 336 धावा ठोकल्या. 1958-59 आणि 1961-62 या वर्षांचं रणजी विजेतेपदही आपटेंच्या नेतृत्वात मुंबईला मिळालं होतं.

माधव आपटेंनी लेग स्पिनर म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र विनू मंकड यांनी माधव आपटेंना सलामीवीर म्हणून खेळवलं. आपटेंच्या पालकांचं मन वळवण्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचं मोठं योगदान मानलं जातं.

आपटेंनी वयाच्या सत्तरीपर्यंत कांगा लीग खेळली. वयाच्या ऐंशीपर्यंत ते बॅडमिंटनही खेळत असतं. माधव आपटे यांनी अनेक वर्ष ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ आणि ‘लेजंड्स क्लब’चं अध्यक्षपद भूषवलं. आपटे मुंबईचे ‘शेरीफ’ही होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *