भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, नीरज चोप्रा की अरशद नदीम? कोण मारणार बाजी?
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यात वादंग झाल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत दोन देश समोर येणार आहेत. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना होणार आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेनंतर या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. कारण भारताचा नीरज चोप्रा, सचिन यादव आणि पाकिस्तानच्या अरशद नदीमने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या सामन्यात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. पात्रता फेरीतून 12 जणांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे. हा सामना 18 सप्टेंबरल होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे नजरा लागून आहेत. भारताच्या नीरज चोप्राने पात्रता फेरीत फक्त एक थ्रो केली आणि अंतिम फेरीत जागा मिळवली. तर सचिन यादव हा पात्रता लाइन पार करू शकला नाही. पण दोन्ही गटातून त्याच्या इतका लांब भाला फेकण्यात यश आलं नाही. त्यामुळे त्याला दहावं स्थान मिळालं आणि अंतिम फेरीत पात्र ठरला. दुसरीकडे, पाकिस्तान अरशद नदीम हा पात्रता फेरीत नीरज चोप्रापेक्षा सरस ठरला. त्याने 85.28 मीटर लांब भाला फेकला. नीरजपेक्षा 1.53 मीटर लांब भाला फेकला. त्यामुळे अंतिम फेरीत अरशदचं तगडं आव्हान नीरजसमोर असेल. नीरज चोप्रा गतविजेता आहे आणि त्याच्यासमोर किताब वाचवण्याचं मोठं आव्हान असेल.
अंतिम स्पर्धेच्या पात्रता फेरीत ग्रेनडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्स याने सर्वाधिक लांब भाला फेकून अव्वल स्थान गाठलं आहे. त्याने 89.53 मीटर लांब भाला फेकला. त्यानंतर जर्मनीच्या जुआन वेबर याचा क्रमांक लागतो. त्याने 87.21 मीटर लांब भाला फेकला. तिसऱ्या क्रमांकावर केनियाचा ज्युलियस येगो (85.96 मीटर), चौथ्या क्रमांकावर पोलंडचा दाविद वेग्नर (85.67 मीटर), पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा अरशद नदीम (85.28 मीटर), सहाव्या क्रमांकावर भारताचा नीरज चोप्रा (84.85 मीटर) राहिला.
सातव्या क्रमांकावर अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन (84.72 मीटर), आठव्या क्रमांकावर चेक रिपब्लिकचा याकुब वडलेच (84.11 मीटर), नवव्या क्रमांकावर केशॉर्न वॉल्कोट (83.93 मीटर), दहाव्या क्रमांकावर भारताचा सचिन यादव (83.67 मीटर), 11 व्या स्थानावर ऑस्ट्रेलियाच कॅमरून मॅकअँटायर (83.03 मीटर) आणि 12व्या स्थानावर श्रीलंकेचा रुमेश थरंगा पथिरगे (82.80 मीटर) असे 12 जण पात्र ठरले आहेत.
