कुस्तीपटू सिकंदर शेखला खोट्या गुन्ह्यात गोवले जात आहे, वडिलांनी व्यक्त केला संशय
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील झालेल्या अन्यायानंतर राज्यभर चर्चेत आलेला कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे संपूर्ण कुस्तीविश्वात एकच खळबळ माजली. पण सिकंदरला झालेल्या अटकेबाबत त्याच्या कुटुंबियांनी कट असल्याचं सांगितलं आहे.

महाराष्ट्र केसरी 2023 च्या कुस्ती स्पर्धेवेळी पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने कुस्तीपटू सिकंदर शेख चर्चेत आला होता. सिकंदर शेखने 2023 साली झालेला अन्यायाचा बदला घेत 2024 मध्ये महाराष्ट्र केसरी चा ‘किताब पटकवला होता. तसेच आपणच कुस्ती विश्वातले सिकंदर असल्याचे सिद्ध केले होता. आता सिकंदर शेख आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळचं कारण मात्र वेगळं आहे. शुक्रवारी अचानक त्याच्या अटकेची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. पंजाब पोलिसांनी सिकंदरसह अन्य आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली. हरियाणा आणि राजस्थानमधील एका कुविख्यात गँगला शस्त्र पुरवठा करत असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं. यामध्ये आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, पाच पिस्तूल, जिवंत काडतुसे, दोन गाड्या जप्त केल्यात. सिकंदर शेख मागील 6 महिन्यापासून हिंद केसरीची तयारी करण्यासाठी पंजाब मध्ये मुक्कामी होता.
दरम्यान या घटनेनंतर पैलवान सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. माझ्या मुलाला यात गोवले जात असल्याचं आरोप त्यांनी केला आहे. लवकरच हिंद केसरी स्पर्धा होणार आहेत, त्यामुळे सिकंदरला यात सहभाग घेता येऊ नये म्हणून त्याला गोवले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच सिकंदरच्या वडिलांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की, त्याला यातून सोडवावे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीदेखील याबाबत भाष्य केलं आहे. या गुन्ह्यात पंजाब पोलीस योग्य ती कारवाई करतील. पण जर महाराष्ट्रातील कुस्तीपटूला कोणी जाणीवपूर्वक खोट्या केसमध्ये अडकवले जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही.
पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गंगावेश तालमीचे वस्ताद आणि हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे. या कृत्यामुळे सिकंदरने कोल्हापूरच्या कुस्तीलाच नाही तर शाहू महाराजांच्या नावाला देखील धक्का लावला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पैशाच्या हव्यासातून सिकंदर ने ही कृत्य केलं असावं असं सांगतानाच दीनानाथ सिंह यांनी सिकंदर शेख याच्या एकूणच वागणुकीबाबत मोठे खुलासे केले.
कोण आहे सिकंदर शेख?
मूळचा सोलापूरचा असलेला सिकंदर शेख कोल्हापूरच्या गंगावेस तालीमीत घडला. 2023 मध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेवेळी त्याच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा झाल्याने तो प्रकाशझोतात आला. 2024 मध्ये स्वतः सिकंदरने आपली ताकद दाखवत महाराष्ट्र केसरीवर आपलं नावं कोरलं होतं. त्यानंतर रुस्तम ए हिंदसह अनेक स्पर्धा जिंकत सिकंदरने आपणच कुस्तीतले सिकंदर असल्याचे सिद्ध केले होते.
मागील अनेक वर्षापासून कुस्ती स्पर्धा आणि कुस्तीपटू हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यातील सत्य आणि तथ्य हे समोर येणे गरजेचे आहे. कारण खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावण्याचे काम करतात. त्यामुळे अशा प्रकरणात योग्य तो तपास व्हावा हीच अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करतात.
