वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानची माघार, भारतात खेळण्यास दिला नकार
ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्प्रधा नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. पण पाकिस्तान या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षात तणावपूर्ण स्थिती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहे. त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही दिसून येत आहे. आशिया कप स्पर्धेत भारताच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानसोबत हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. जिंकलेली ट्रॉफीही पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीच्या हातून घेतली नाही. महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही तीच स्थिती होती. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत झाले. असं असताना पुढच्या महिन्यात ज्यूनिअर हॉकी वर्ल्डकप 2025 स्पर्धा भारतात होत आहेत. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत असणार असून तामिळनाडूच्या चेन्नई आणि मदुरईत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या स्पर्धेतून पाकिस्तानने नाव मागे घेतलं आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 24 संघ भाग घेणार आहेत. त्यात ब गटात भारत आणि पाकिस्तान होते. तर दुसरे दोन संघ चिली आणि स्वित्झर्लंड आहेत. आता पाकिस्तानने नाव मागे घेतल्याने दुसऱ्या संघाला संधी मिळू शकते. त्या संघाची लवकर घोषणा केली जाईल. यापूर्वीही झालेल्या आशिया हॉकी स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 24 ऑक्टोबरला जाहीर केलं की पाकिस्तानने या स्पर्धेतून नाव मागे घेतलं आहे. एफआयएच्या प्रेस रिलीजनुसार, पाकिस्तानच्या हॉकी फेडरेशनने सांगितलं की या स्पर्धेत भाग घेणार नाही आणि या स्पर्धेत पात्र ठरूनही स्पर्धेतून नाव मागे घेतलं.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी एफआयएचला दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा होती. पण भारतात खेळण्यास तयार नाहीत. न्यूट्रल जागी स्पर्धा खेळण्याची तयारी होती. पण एफआयएचने त्याला नकार दिला. दुसरीकडे, हॉकी इंडियाने याबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्याबद्दल त्यांना अद्याप एफआयएचकडून माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झाल्याने नव्या संघाची एन्ट्री होणार आहे. यापूर्वी आशिया हॉकी स्पर्धेतही अशीच रणनिती होती.
