Rohit Sharma : ‘रोहित शर्मा जाडा..’ काँग्रेसच्या प्रवक्त्याने तोडले अकलेचे तारे
भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार रोहित शर्माबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली. त्यावेली त्याने वादग्रस्त विधानही केले. यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने जोरदार वाटचाल करताना दिसत आहे. सलग 3 विजयांसह भारताने उपांत्य फेरीतही मजल मारली आहे. काल न्युझीलंडलाही भारताने हरवले असून आता सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ आणि कर्णधार रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक होत असताना, देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसच्या एका नेत्याने भारतीय कर्णधारावर भयानक आणि वादग्रसत् टिप्पणी केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ शमा मोहम्मद यांनी रोहितचे वर्णन ‘लठ्ठ’ असे केले आणि त्याला भारतीय इतिहासातील सर्वात ‘अप्रभावी’ कर्णधारही म्हटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रोहित लठ्ठ, वजन कमी करण्याची गरज
दुबईमध्ये भारत वि. न्युझीलंड असा सामना सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याने ही टिप्पणी केली. काँग्रेस प्रवक्त्या आणि व्यवसायाने दंतचिकित्सक असलेल्या डॉ. शमा मोहम्मद यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अकाऊंटवर रोहितला टॅग करत एक पोस्ट पोस्ट केली. “ खेळाडू म्हणून रोहित शर्मा लठ्ठ आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तो निश्चितच भारताचा सर्वात निष्प्रभावी कॅप्टनही आहे” अशी पोस्ट त्यांनी लिहीली.
– @ImRo45 is fat for a sportsman! Need to lose weight! And ofcourse the most unimpressive Captain India has ever had !
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) March 2, 2025
भारतीय कर्णधार रोहित गेल्या काही वर्षात अनेकवेळा त्याच्या फिटनेसच्या संदर्भात चर्चेत आला आहे, परंतु त्याची कामगिरी, मोठी खेळी आणि मजबूत क्षेत्ररक्षणाने तो टीकाकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसतो.मॅच फिटनेस आणि नियमित फिटनेसमध्ये खूप फरक आहे आणि तो मॅचमध्ये खेळण्यासाठी फिट आहे, हे रोहितने वेळोवेळी सिद्ध केलं आहे.
साधारण खेळाडू आणि कॅप्टन
पण शमा मोहम्मद इथेच थांबल्या नाहीत आणि पुढे जाऊन त्यांनी रोहितचे वर्णन एक सामान्य कर्णधार आणि सामान्य खेळाडू असे केले आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या तुलनेत तो काहीच नसल्याचे सांगितले. “गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री आणि त्याच्या आधी आलेल्या इतरांच्या तुलनेत असं काय खास आहे. तो एक साधारण कर्णधार आणि सामान्य खेळाडू आहे ज्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. ” अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली.
What is so world class about him when compared to his predecessors like Ganguly, Tendulkar, Dravid, Dhoni, Kohli , Kapil dev, Shastri & the rest! He is a mediocre captain as well as a mediocre player who got lucky to be the Captain of India. https://t.co/zrSaFHxx3T
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) March 2, 2025
रोहितचे कर्णधारपद आणि कामगिरी
कर्णधारपदाचा विचार केला तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी सातत्याने सुधारत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. 2023 च्या विश्वचषकात संघ भारतीय सघाने फक्त एकच अंतिम सामना हरला होता. तर T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने उपांत्य फेरीपूर्वीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. या तिन्ही स्पर्धांमध्ये रोहितने आतापर्यंत बॅटने छाप पाडली आहे. साहजिकच, रोहितचे कर्णधारपद अप्रतिम आहे,त्याच्यावर जे टीका करतात, प्रश्न उपस्थित करतात, त्यांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहे.
