धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणतात…

धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणतात...

मी संघातून बाहेर गेलो होतो, तेव्हाही अशाप्रकारच्या अनेक चर्चा झाल्या, पण मी परतलो, असं गांगुली म्हणाले.

Nupur Chilkulwar

|

Oct 23, 2019 | 5:11 PM

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बुधवारी (23 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला (BCCI Chief Saurav Ganguly). पदभार सांभाळल्यानंतर गांगुली यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबतही प्रश्न विचारण्यात आले (MS Dhoni Retirement). धोनी हा महान खेळाडू आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रत्येक खेळाडूचा सन्मान होईल, असं गांगुली यांनी सांगितलं. तसेच, जे चॅम्पिअन असतात त्यांचा खेळ नेहमी टिकून राहतो, ते सहजासहजी पराभव स्विकारत नाही, असंही गांगुली म्हणाले (BCCI Chief Saurav Ganguly).

धोनीच्या मुद्यावर गांगुली यांनी टीम मॅनेजमेंट किंवा निवड समितीशी चर्चा केली का, असंही गांगुली यांना विचारण्यात आलं. मी संघातून बाहेर गेलो होतो, तेव्हाही अशाप्रकारच्या अनेक चर्चा झाल्या, पण मी परतलो, असं उत्तर यावेळी गांगुली यांनी दिलं. तसेच, महेंद्र सिंह धोनी हे भारतीय क्रिकेटचे मोठे खेळाडू आहेत. त्यांचा आतापर्यंतचा खेळ पाहिला तर त्यांचं कौतुक वाटतं, असंही गांगुली म्हणाले.

निवृत्तीचा निर्णय सर्वस्वी धोनीचाच

धोनीच्या निवृत्तीवर आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही, नाही मॅनेजमेंटकडून त्यांच्यावर कुठला दबाव आणला जाईल. या मुद्यावर फक्त धोनी हेच निर्णय घेतील. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत प्रत्येक खेळाडूचा सन्मान होईल, असं गांगुली यांनी स्पष्ट केलं. सध्या धोनी हा संघातून बाहेर आहे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो संघात नव्हता. 2019 च्या विश्वचषकानंतर धोनीच्या निवृत्तीवर अनेक अंदाज लावले जात आहे. मात्र, धोनी किंवा बीसीसीआयकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली कर्णधान विराट कोहलीला भेटणार

सध्या माझी कर्णधार कोहलीशी काहीही चर्चा झालेली नाही, मात्र मी लवकरच त्याची भेट घेणार असल्याचं गांगुली यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विराट कोहली हा सध्या भारतीय संघाचा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यामुळे भविष्यात त्यांची भूमिका खूप मोठी असणार आहे, असंही गांगुली यांनी सांगितलं.

सौरव गांगुली हे बिनविरोध बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवडूण आले. अनेक वर्षांनंतर एक खेळाडू या पदावर आला आहे. सौरव गांगुल यांनी बुधवारी बीबीसीआय अध्यक्षपद सांभाळलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें