मुंबई : मुंबई संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा प्रथम श्रेणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील सर्वात युवा फलंदाज (Yashasvi Jaiswal Double Century) ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्धच्या सामन्यात यशस्वीने बुधवारी आपल्या नावे हा विक्रम नोंदवला. यशस्वीचं वय 17 वर्ष 292 दिवस आहे.
सर्वात कमी वयात द्विशतक ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एलन बारो याच्या नावे होता. एलनने 1975 मध्ये दक्षिण आफ्रिकेत नोंदवलेला विक्रम यशस्वीने तब्बल 44 वर्षांनी मोडित काढला.
यशस्वीने 154 चेंडूंमध्ये 203 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या द्विशतकी खेळीला 12 षटकार आणि 17 चौकारांचा साज होता. बंगळुरुत खेळवल्या जात असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने झारखंडविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यशस्वीच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने तीन विकेट गमावून 358 धावा केल्या.
‘विजय’ हजारे ट्रॉफीत ‘यशस्वी’ कामगिरी
विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमातील यशस्वीचं हे तिसरं शतक आहे. यशस्वीने पाच सामन्यांमध्ये आतापर्यंत 585 धावा ठोकल्या आहेत. टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला आहे. याच टूर्नामेंटमधून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
हजारे ट्रॉफीत तिसरा द्विशतकवीर
विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकणारा यशस्वी (Yashasvi Jaiswal Double Century) हा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी केरळचा संजू सॅमसन आणि उत्तराखंडच्या कर्ण कौशलने ही कामगिरी बजावली आहे. सॅमसनने याच वर्षी गोव्याविरुद्ध 212 धावा केल्या, तर कौशलने गेल्या मोसमात सिक्कीमविरोधात 202 धावांची खेळी केली होती.
सातवा भारतीय
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा यशस्वी हा सातवा भारतीय ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, कर्ण कौशल आणि संजू सॅमसन यांनी ही कामगिरी बजावली आहे. रोहितने सर्वाधिक म्हणजे तीन द्विशतकं लगावली आहेत.
दहाव्या वर्षी मुंबई गाठली
यशस्वी जयस्वाल हा मूळ उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे वडील गावी एक लहानसं दुकान चालवतात. क्रिकेटमध्ये नशिब आजमावण्यासाठी यशस्वीने दहाव्या वर्षी मुंबई गाठली. कुटुंबाने त्याला आडकाठी केली नाही.
पाणीपुरी विकून उदरनिर्वाह
यशस्वीने उदरनिर्वाहासाठी मुंबईत पाणीपुरी विकण्याचा पर्यायही निवडला होता. आझाद मैदानात तो पाणीपुरी आणि फळं विकायला मदत केली. काही वेळा उपाशीपोटी झोपण्याची वेळ आल्याचंही तो सांगतो. मात्र आता यशस्वीची कामगिरी सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.
वाचा : आई ‘बेस्ट’मध्ये कंडक्टर, अंडर 19 आशिया चषक गाजवणाऱ्या अथर्व अंकोलेकरचं अंधेरीत जंगी स्वागत