Video: जेव्हा कलेक्टरनं लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात काढली, बघा काय काय घडलं?

कोरोना संसर्गाने आक्राळविक्राळ रुप धारण केल्याने सरकारने अनेक निर्बंध लावलेत. मात्र, अनेक ठिकाणी या निर्बंधांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जात आहेत.

Video: जेव्हा कलेक्टरनं लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात काढली, बघा काय काय घडलं?


नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे लाखो लोकांना रुग्णालयात भरती व्हावं लागत आहे, तर हजारो लोकांनी आपले जीव गमावले आहेत. कोरोना संसर्गाने आक्राळविक्राळ रुप धारण केल्याने सरकारने अनेक निर्बंध लावलेत. मात्र, अनेक ठिकाणी या निर्बंधांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जात आहेत. असाच एक प्रकार त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथे घडला. आगरताळात नियमांचं उल्लंघन करत होत असलेल्या लग्नात जिल्हाधिकाऱ्यांनी घुसून थेट वर्हाडींचींच वरात काढल्याचं पाहायला मिळालं. शैलेश यादव असं या जिल्हाधिकारींचं नाव आहे (Agartala DM action against marriages in Tripura amid Corona restriction violation).

आगरताळातही देशातील इतर भागांप्रमाणेच कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलंय. एकिकडे अनेक रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत असल्याचं आणि उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करत होत असलेल्या लग्नांना पोलिसांकडूनही अभय असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे एकूणच नागरिक आणि पोलिसांचं बेजबाबदार वर्तन पाहून जिल्हाधिकारी शैलेश यादव चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

नेमकं प्रकरण काय?

जिल्हाधिकारी शैलेश यादव यांना एका रुग्णालयातून आयसीयू बेडमध्ये काही तांत्रिक दोष असल्याची तक्रार आली. त्यावेळी त्यांनी स्वतः तेथे जाऊन पाहणी केली आणि त्यावर उपाययोजनांचे आदेश दिले. आयसीयूतील रुग्णांची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी शहरातील स्थिती कशी आहे हे पाहण्याचा निर्णय घेतला. रस्त्याने जाताना त्यांना मंगल कार्यालयांमध्ये नियमांचं उल्लंघन करत लग्नसोहळे होत असताना दिसले. 10 वाजल्यानंतर कोणतेही मंगल कार्यालय सुरु ठेवण्यास परवानगी नव्हती. तरीही ही मंगल कार्यालये सुरुच होती. शिवाय कमी लोकांना परवानगी असताना लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. अनेकजणांनी मास्कही घातलेला नव्हता.

एकूणच कायद्याचं उल्लंघन आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका हे सर्व पाहून संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी स्वतः मंगल कार्यालयात जाऊन कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातलेल्या वऱ्हाडींना थेट दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला, तर नियम तोडूनही आम्ही काहीच चुकीचं केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट अटक करण्यात आली.

नियम मोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशिलात

संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी प्रशासन आलेलं असतानाही आपल्याच धुंदीत असलेल्या वऱ्हाड्यांना थेट चोपण्याचे आदेश दिले. पोलीस यंत्रणा वरवरची कारवाई करताना पाहून त्यांनी स्वतः पुढे होऊन कारवाई करण्यास सुरवात केली. यावेळी एका लग्नात तर त्यांनी नियम मोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशिलातही लगावली.

“तुमचे पोलीस अधिकारी भ्रष्ट, निलंबन करणार”

मंगल कार्यालयात उघडउघड नियमांचं उल्लंघन होत असतानाही पोलीस यंत्रणा केवळ बघ्याचं काम करत होती. हे पाहून पोलिसांनी मंगल कार्यालय मालकांकडून पैसे घेतलेले आहे. यांच्या संगनमतानेच हे सर्व होत असल्याचंही मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यांनी त्याच ठिकाणाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुन जाब विचारला. तसेच कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केली.

कारवाईचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण जिल्हाधिकाऱ्यांच्या सिंघम स्टाईल कारवाईसाठी त्यांचं कौतुक करत आहेत. मात्र, काहीजण त्यांच्या कारवाईवर आक्षेप घेत आहेत. तसेच त्यांनी अपशब्द वापरल्याचा आणि लग्नात लाठीचार्ज केल्याचा आरोप करत आहेत.

हेही वाचा :

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात?

लॉकडाऊनमुळे सुट्टी कॅन्सल; सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच उरकली महिला कॉन्स्टेबलची हळद

दारु पिण्याची हुक्की आल्याने सॅनिटायझर प्यायले, 6 जणांचा मृत्यू; यवतमाळ हादरले

व्हिडीओ पाहा :

Agartala DM action against marriages in Tripura amid Corona restriction violation