20 मिनिटांत करोडो रुपये गायब! आजवर सापडले नाहीत… हॉलिवूडलाही लाजवेल अशा हेलिकॉप्टर दरोड्याविषयी ऐकलंय का? वाचा
आज आम्ही तुम्हाला एका अशा दरोड्याच्या कहाणीविषयी सांगणार आहोत, ज्याला जगातील पहिला हेलिकॉप्टर दरोडा म्हणतात. या हेलिकॉप्टर दरोड्यात चोरलेले पैसे आजपर्यंत सापडलेले नाहीत.

जगभरात चोरीच्या घटना या घडतच असतात. पण काही घटना अशा असतात ज्या चित्रपटातील एखाद्या सीन किंवा पुस्तकातील कथेप्रमाणे वाटतात. अशीच एक घटना 2009मध्ये घडली होती. या दरोड्यासाठी चोरांनी थेट हेलिकॉप्टरचा वापर केला केला होता. हा जगातील पहिला हेलिकॉप्टर दरोडा असेही म्हटले जाते. या गुन्ह्यात दरोडेखोरांनी इतक्या बारकाईने नियोजन केले होते की पोलिस त्यांच्या कित्येक पावले मागे राहिले आणि दरोडेखोर कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाले. आजही या दरोड्याचे पैसे सापडलेले नाहीत.
नेमकं काय घडलं?
खरे तर, 30 सप्टेंबर 2009 च्या पहाटे साधारण 5 वाजण्याचा सुमार होता. वेस्टबर्गा येथे स्टॉकहोमच्या रस्त्यांवर शांतता पसरली होती. पण तेवढ्यात आकाशातून एक हेलिकॉप्टर खाली उतरले आणि थेट G4S सिक्योरिटी कंपनीच्या कॅश डेपोच्या छतावर लँड झाले. या कॅश डेपोमध्ये लाखो युरो रोख स्वरूपात ठेवलेले होते. हेलिकॉप्टरमधून काही मुखवटा लावलेले लोक बाहेर पडले. त्यांच्या हातात मोठा हातोडा आणि स्फोटके होती. त्यांनी छतावरून इमारतीत प्रवेश करताच प्रथम सुरक्षा दरवाजे उडले आणि मग थेट त्या खोलीपर्यंत पोहोचले जिथे रोख रकमेने भरलेल्या तिजोऱ्या होत्या.
एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखी घटना
पोलिसांनी हेलिकॉप्टर वापरू नये यासाठी दरोडेखोरांनी पोलिस मुख्यालयाच्या हेलिकॉप्टर हँगरमध्ये एक पिशवी ठेवली होती. त्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिले होते. पोलिसांना भीती होती की त्यात खरोखरच बॉम्ब असू शकतो, त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण होऊ शकले नाही. जमिनीवरून येणाऱ्या पोलिसांना रोखण्यासाठी दरोडेखोरांनी रस्त्यांवर स्पाइक्स पसरवले होते. जेव्हा पोलिसांच्या गाड्या तिथे पोहोचल्या, तेव्हा त्यांचे टायर फुटले आणि ते पुढे जाऊ शकले नाहीत. दरम्यान, हेलिकॉप्टर तो पर्यंत छतावर उभे होते. जेणेकरून दरोडेखोर त्यांचे काम झाले की लगेच पळून जाऊ शकतील.
ही संपूर्ण घटना अवघ्या 20 मिनिटांत पार पडली. दरोडेखोरांनी रोख रकमेने भरलेल्या जड बॅग घेऊन पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश केला आणि ते आकाशात उडून गेले.
हवेत गायब झालेले चोर
दरोड्यानंतर लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पण जोपर्यंत ते घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत दरोडेखोर हवेत गायब झाले होते. कॅश डेपोच्या सुरक्षा यंत्रणेला दरोडेखोरांनी हुशारीने चकमा दिला होता. आता पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला की, इतक्या उच्च तंत्रज्ञानाने आणि सुरक्षित इमारतीत कोणी इतक्या सहजपणे दरोडा कसा घालू शकतो?
आजपर्यंत पैसे सापडले नाहीत
जेव्हा स्वीडिश पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू केला तेव्हा अनेक दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, स्थानिक लोकांशी चौकशी केली गेली आणि हेलिकॉप्टरच्या उड्डाण रेकॉर्डची तपासणी केली गेली. अखेरीस सुमारे 10 लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये त्या हेलिकॉप्टरचा पायलटही होता, ज्याने चोरीचे हेलिकॉप्टर उडवले होते. तसेच, जेव्हा हा खटला न्यायालयात गेला, तेव्हा मुख्य आरोपी जोय याला सात वर्षांची शिक्षा झाली, तर इतरांना चार ते सहा वर्षे. आणि पैसे? ते आजपर्यंत सापडले नाहीत. कदाचित कुठेतरी लपवले असावेत किंवा खर्च झाले असावेत.
