Ajit Pawar : सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं ? अजित दादांनी शेतकऱ्यांना फटकारलं
अजित पवारांनी शून्य टक्के व्याजावरील कर्ज फेडण्याची आवश्यकता मांडत, वारंवार कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन दिल्याची कबुली त्यांनी दिली. हे जनतेची आणि शेतकऱ्यांची फसवणूक असून, येत्या निवडणुकीत मतदार याचा बदला घेतील, अशी टीका एका भाषणात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील राजकारणात सध्या कर्जमाफीच्या मुद्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले, ज्यात त्यांनी शून्य टक्के व्याजाने मिळालेले कर्ज शेतकऱ्यांनी फेडावे, असं म्हटलं. “सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं?” असा सवाल करत त्यांनी वारंवार कर्जमाफी देण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अजित पवारांनी यावेळी निवडणुकीच्या राजकारणावरही भाष्य केले. “निवडून यायचं होतं म्हणून, आम्ही कर्ज माफ करू असं बोललो,” अशी कबुली त्यांनी दिली. यापूर्वीही शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारांनी कर्जमाफी दिली होती, याचाही उल्लेख त्यांनी केला. मात्र, आता पुन्हा कर्जमाफीची मागणी होत असताना, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणलं. अजित पवारांच्या या वक्त्वायवरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
