अमरावतीत चोरांचा धुमाकूळ! 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

अमरावतीत चोरांचा धुमाकूळ! 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

| Updated on: Feb 22, 2026 | 10:28 AM

अमरावतीत चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक चिंतेत आहेत. पाच न्यायाधीशांच्या घरांनंतर आता अवघ्या १५ मिनिटांत तीन सामान्य लोकांची घरे फोडण्यात आली. चोरांनी अत्यंत शांतपणे हे कृत्य केले असून, यामुळे पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी नेत्यांनी या गंभीर विषयावर मौन बाळगले आहे.

अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच, पाच न्यायाधीशांच्या घरात झालेल्या चोरीनंतर आता शहरात अवघ्या १५ मिनिटांत तीन सामान्य लोकांची घरे फोडण्यात आली आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, चोर अत्यंत शांतपणे आपले कृत्य करताना दिसत आहेत. यामुळे अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरांनी प्रथम अशा घरांची पाहणी केली, जिथे लोक गावाला गेले होते. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने, ज्या घरात लोक उपस्थित होते, त्यांना बाहेरून कड्या लावून आरडाओरड करण्यापासून रोखले. रेवसा आणि नवसारी परिसरात ही घटना घडली. चोरांनी घरातील वस्तूंबरोबरच घराबाहेर ठेवलेले बूट देखील सोडले नाहीत. एखाद्याच्या घरी नाश्त्यासाठी आल्यासारख्या निवांतपणे त्यांनी तीन घरे फोडली आणि सहजपणे बाहेर पडले. यापूर्वी शहरातील एका सुवर्ण अलंकाराच्या दुकानालाही लक्ष्य करण्यात आले होते.

अमरावतीतील प्रत्येक मुद्द्यावर बोलणारे सत्ताधारी नेते या वाढत्या चोरीच्या घटनांवर मात्र मौन बाळगून असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यामुळे ऐरणीवर आली आहे.

Published on: Feb 22, 2026 10:28 AM