मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळेना; बच्चू कडूंचा वनविभागाला घेरावाचा इशारा

| Updated on: Mar 03, 2026 | 11:34 AM

मेळघाटातील आदिवासी बांधवांना पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वनविभागाकडून होणाऱ्या त्रासाविरोधात बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हक्काचे पाणी न मिळाल्यास वनविभागाचे कार्यालय घेराव घालण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा अन्याय सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

मेळघाटातील आदिवासी बांधव गेल्या ७५ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वीज आणि पाणी यांसारख्या अत्यंत आवश्यक गरजा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करत आमदार बच्चू कडू यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विकसित भारतच्या चर्चांमध्ये मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.

कडू यांनी वनविभागावर गंभीर आरोप केले आहेत. स्वतःच्या शेतात विहीर खोदण्याची परवानगी नसणे, जनावरे चारण्यावर निर्बंध, नकाशावरील रस्त्यांवर काम करू न देणे आणि पाणी उपलब्ध असतानाही केवळ २०० मीटरची पाईपलाईन टाकण्यासही मनाई करणे, हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी हा मूलभूत हक्क असूनही वनविभाग सैतानासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासींना त्यांचे हक्काचे पाणी न मिळाल्यास, तसेच वनविभागाचा जाच थांबवला नाही, तर वनविभागाचे कार्यालय घेराव घालणार, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा अन्याय सहन केला जाणार नाही, असे कडू यांनी ठामपणे सांगितले.

Published on: Mar 03, 2026 11:34 AM
Follow Us