Mumbai Bandra | वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर हातोडा

| Updated on: May 20, 2026 | 11:47 AM

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू केली असून, सहा बुलडोझरच्या सहाय्याने रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे पाडण्यात येत आहेत.

या कारवाईदरम्यान तीन ते चार मजली झोपड्या, पत्र्याची घरे तसेच काही व्यावसायिक गाळे हटवण्यात येत आहेत. रेल्वे मार्गालगत उभारण्यात आलेल्या या अतिक्रमणांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कारवाईदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, महापालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई सुरू आहे.
दरम्यान, घरांवर कारवाई होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून “पर्यायी जागा द्या, मगच कारवाई करा,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित जागा रेल्वेच्या मालकीची असून अनेक वेळा नोटिसा देऊनही अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, या कारवाईमुळे वांद्रे पूर्वमधील दोन रेल्वे पूल बंद ठेवण्यात आले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम आहे.

Published on: May 20, 2026 11:47 AM
Follow Us