महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क… चकित करणारं कारण समोर

महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क… चकित करणारं कारण समोर

| Updated on: Sep 10, 2026 | 11:06 AM

भिवंडी येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून एका फळविक्रेत्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. मोहम्मद याकूब सिद्दीकी असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांना मारहाण करणारी महिला लक्ष्मीबाई नाईक हिला अटक करण्यात आली आहे. मारहाणीनंतर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

भिवंडीमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका फळविक्रेत्याचा मारहाणीत जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे. मृत फळविक्रेत्याचे नाव मोहम्मद याकूब सिद्दीकी असे आहे, तर अटक केलेल्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई नाईक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नाईक यांचा मोहम्मद याकूब सिद्दीकी यांच्यासोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद होता. पैसे घेतले असतानाही ते परत देत नसल्याच्या कारणावरून लक्ष्मीबाई स्वतः मोहम्मद सिद्दीकी यांच्याकडे आल्या होत्या. यावेळी त्यांच्यात तीव्र बाचाबाची झाली. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. लक्ष्मीबाई नाईक यांनी मोहम्मद सिद्दीकी यांना हाताने, ठोशाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.

केवळ इतकेच नाही, तर त्यांना चप्पलने मारले आणि खाली पडल्यानंतरही लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण सुरू ठेवली. या गंभीर मारहाणीमुळे मोहम्मद याकूब सिद्दीकी यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी तातडीने रिक्षातून दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. रात्री उशिरा महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी लक्ष्मीबाई नाईक यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास सुरू आहे.

Published on: Sep 10, 2026 11:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us