Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर

| Updated on: Aug 06, 2026 | 2:48 PM

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.जात पडताळणी प्रक्रियेत कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप होऊ शकत नाही

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जात पडताळणी प्रक्रियेत कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप होऊ शकत नाही, असा दावा करत त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट करण्यासही तयारी असल्याचे जाहीर केले.

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “माझी नार्को टेस्ट करा, त्यासाठी माझी पूर्ण परवानगी आहे. जात पडताळणी विभाग हा अर्ध-न्यायिक (Quasi-Judicial) विभाग आहे. त्या प्रक्रियेत कोणताही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकत नाही. कोणताही मंत्री फोन करून जात पडताळणी समितीचा निर्णय बदलू शकत नाही आणि समितीही अशा कोणत्याही दबावाखाली काम करत नाही.”

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, “जरांगे यांनी असे आरोप का केले, हे मला माहिती नाही. जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयावर कुणाला आक्षेप असेल, तर त्यांच्यासाठी न्यायालयाचा मार्ग खुला आहे. अन्याय झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन अपील करावे आणि आवश्यक असल्यास स्थगिती (स्टे) मिळवावी.”

ते पुढे म्हणाले की, “जात पडताळणी समितीने कोणत्या कारणांमुळे प्रमाणपत्र रद्द केले, याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. संबंधित निर्णय आणि माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहता येऊ शकते. या प्रक्रियेत सरकारचा किंवा मंत्र्यांचा कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेतले जातात, हा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही.”

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, “जरांगे नेमके काय बोलले, ते मी पूर्णपणे ऐकलेले नाही. त्यामुळे त्या वक्तव्यावर अधिक भाष्य करणार नाही.”
कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, या प्रकरणावर सरकार, मराठा आंदोलन आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत.

Published on: Aug 06, 2026 2:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us