NCP Ram Khade : अंधाराचा फायदा अन् 10-15 जणांकडून जीवघेणा हल्ला, राम खाडेंवर हल्ला करण्याचं कारण समोर?
बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ते गंभीर जखमी असून श्रीदीप रुग्णालयात उपचार घेत आहेत. राजकीय वैमनस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी संबंधित मोठा घोटाळा उघड केल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या श्रीदीप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला रात्री 9 ते 9:15 च्या सुमारास घडला. राम खाडे आणि त्यांचे सहकारी मांदगाव येथील पाटील हॉटेलमध्ये जेवणानंतर बाहेर पडत असताना, 10 ते 12 हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. सर्वप्रथम किशोर मुळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी राम खाडे यांना गाडीतून बाहेर काढून त्यांना दूर पटांगणात नेऊन मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडल्या. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.