Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांना आता राजकीय वर्तुळात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस यांनी दिल्लीत जावं आणि सर्वोच्च पदावर विराजमान व्हावं, ही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा नसून महाराष्ट्राचीही इच्छा असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला. “देवेंद्र फडणवीस रोज दिल्लीत का जात आहेत? ७२ तासांनी दिल्लीत का जावं लागतं? महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे. उठसूट दिल्लीत जाऊन काय चर्चा करता?” असा सवाल त्यांनी केला.
दिल्लीतील फडणवीस यांच्या दौऱ्यांमागे नेमकी काय चर्चा सुरू आहे, याची आपल्याला माहिती असल्याचा दावाही राऊत यांनी केला. “मोदी आणि फडणवीस यांची चर्चा काय झाली, हे मी सांगू शकतो. माझं इंटेलिजन्स मजबूत आहे,” असे ते म्हणाले.
फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही दिल्लीतच झाला होता, असा दावा करत राऊत म्हणाले की, “त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला. ते त्यांनी ठरवलं होतं का? ते नाही ठरवू शकत. त्यामुळे त्यांना दिल्लीत मोदी मंत्रिमंडळात जावं लागणार आहे.”
यावेळी राऊत यांनी भाजपमधील संभाव्य भविष्यातील नेतृत्वबदलाबाबतही सूचक विधान केले. “नव्या फेरबदलात उपपंतप्रधानपद असावं. संघाच्या विचाराला मानणारा उपपंतप्रधान असावा. तो पंतप्रधानांचा वारसदार असेल. अमित शाह नाही, अशी संघाची भूमिका आहे,” असा दावा त्यांनी केला. मात्र, या वक्तव्यात आपण कोणाचंही नाव घेत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. “मी कुणाचं नाव घेतलं नाही. तुमच्या मनात फडणवीस असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असे सूचक विधान त्यांनी केले.
दरम्यान, फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यांबाबत आणि भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राऊत यांच्या दाव्यांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.