धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. चाराटंचाईमुळे जनावरांचे हाल होत असून, दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. भूम तालुक्यातील शेतकरी संजय गोपणे यांच्यासारखे अनेक दुग्ध उत्पादक चाऱ्याच्या समस्येने त्रस्त आहेत. सरकारने तातडीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने खंड दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असून, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. भूम तालुक्यातील वारेवडगाव येथील शेतकरी संजय गोपणे यांच्यासारखे अनेक शेतकरी या परिस्थितीत अडचणीत आले आहेत. संजय गोपणे हे दोन एकर शेती असूनही सुमारे 30 गाई सांभाळतात. मात्र, पावसाअभावी हिरवा चारा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. सध्या सोयाबीनच्या भुसकटावर जनावरे सांभाळली जात आहेत, पण हा चारा केवळ 8-10 दिवसच पुरेल अशी त्यांची स्थिती आहे.
पावसाअभावी त्यांचे दूध उत्पादन 300 लिटरवरून 150 लिटरवर आले आहे. एक-एक लाख रुपयांच्या गाई असल्याने, चाऱ्याअभावी जनावरांचे नुकसान झाल्यास मोठे आर्थिक संकट ओढवणार असल्याची भीती गोपणे यांनी व्यक्त केली. सरकारने जनावरांसाठी छावण्या आणि चाऱ्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात अतिवृष्टी आणि महापूर आले होते, तर यावर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे.
