धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष…काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील होरटी दिव्यांग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल समोर आले आहेत. पुरेसे अन्न नाही, पाणी नाही आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेल्या होरटी येथील अस्थिव्यंग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची गंभीर आणि विदारक अवस्था उघड झाली आहे. या शाळेत दिव्यांग मुलांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या ताटात पुरेसे अन्न नसल्याचे, तसेच पिण्याच्या पाण्याचीही अपुरी सोय असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्वच्छतागृहांना दरवाजे नसून त्यांची दुरवस्था झाली आहे, ज्यामुळे विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील स्वयंपाकघरातही एकच हंडा आणि तेलाच्या रिकाम्या पिशव्या दिसल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा आणि पोषक आहार मिळत नसल्याचे स्पष्ट होते. राज्यात विकासाच्या मोठ्या बाता मारल्या जात असताना, जन्मतः दिव्यांग असणाऱ्या या मुलांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी चालवल्या जाणाऱ्या अनुदानित निवासी शाळांची अशी परिस्थिती चिंताजनक आहे. शासनाकडून निधी मिळत असतानाही, निधीचा वापर योग्य प्रकारे होत नसल्याचे या दृश्यांवरून दिसून येते. संबंधित प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
