दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा गावात दुष्काळामुळे यंदा दिवाळीचा उत्साह मावळला आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पाऊस नसल्याने विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना, अनेक किलोमीटर दूरवरून पाणी आणावे लागत आहे. दिवाळीतही पाणीटंचाईमुळे मुलांवर चटणी-भाकरी खाण्याची वेळ आली असून, जनावरांसाठी चाराही उपलब्ध नाही.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा गावात दुष्काळामुळे यंदा दिवाळीचा सण पूर्णपणे झाकोळून गेला आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पाऊस न झाल्याने गावातील विहिरी, हातपंप आणि बोअरवेल पूर्णपणे कोरडे पडले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना, अनेक किलोमीटर पायपीट करून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे घराघरात दिवाळीचा कोणताही उत्साह दिसत नाही.
ना रांगोळी, ना पणत्या, ना आकाशकंदील. या परिस्थितीमुळे चिमुकल्यांना दिवाळीत मिठाईऐवजी चटणी-भाकरीवर समाधान मानावे लागत आहे. गावकऱ्यांच्या मते, दुष्काळामुळे त्यांच्याकडे सण साजरा करण्यासाठी पैसेही नाहीत. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही, तर पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या आहे. दोन-तीन किलोमीटरवरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत असून, बैलगाड्यांचाही वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वी टँकरसाठी प्रस्ताव पाठवला असला तरी, अद्याप तहसील कार्यालयाने त्याला मंजुरी दिलेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
