मराठी शाळा बंद पडणं, ही बाब गंभीर! सामनाच्या अग्रलेखातून टीका
सामना वृत्तपत्राने राज्यातील 255 मराठी शाळा बंद पडण्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत ही कबुली दिल्यानंतर, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे सामनाने म्हटले आहे. मुंबईतील मराठी संस्कृती धोक्यात येत असून, या परिस्थितीसाठी प्रशासकीय उदासीनता जबाबदार असल्याचे त्यात नमूद केले आहे.
शिवसेनेचे (उबाठा) मुखपृष्ठ असलेल्या सामना वृत्तपत्राने राज्यातील मराठी शाळा बंद पडण्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मराठी शाळा बंद पडणं, ही बाब गंभीर असे म्हणत सामनाने राज्यभाषेच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मराठी भाषा चिरायू होण्यासाठी मराठी शाळा टिकायला हव्यात, असे सामनामध्ये म्हटले आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिलेल्या कबुलीनुसार, राज्यात 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, मुंबईतील मराठी संस्कृतीच्या संस्था, मैदाने आणि जिमखानेही हातचे गेले आहेत, अशी भीती सामनाने व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मुंबईचा भूगोलही बदलला जातो की काय, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या सरकारी जाहिरातबाजीवरही सामनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा दर्जा मिळाल्याला दीड वर्ष होऊनही तो केवळ कागदावरच राहिला असून, प्रत्यक्षात मराठी शाळा बंद पडत आहेत, याकडे लक्ष वेधले आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मुले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातही मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठी टॅलेंट उपलब्ध असताना गुजरातच्या कंत्राटदारांना प्राधान्य देणे, हे मराठीच्या पिछेहाटीचे प्रमुख कारण असल्याचे सामनाने नमूद केले आहे.
