किती पोटदुखी… किती जळजळ… शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून ठाकरे गटाने केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी रुग्णालयात उपचार घेत असतानाही माझं काम सुरूच होतं. आम्ही खोटी सहानुभूती दाखवणारे नाही. अनेक नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, पण आम्ही कधी त्याबाबत प्रश्न विचारला नाही. आमच्यात परस्परांवर पूर्ण विश्वास आहे.”
शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीवरून होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “पवार साहेब हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आदर करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. तुम्ही जितक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलाल, तितकंच स्वतःचं नुकसान करून घ्याल. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे स्वतःच आपला खड्डा खोदत आहेत.”
यावेळी त्यांनी त्या भेटीचा खुलासाही केला. “सीमाप्रश्नावरील बैठकीनंतर पवार साहेब माझ्या दालनात आले होते. मी त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. पवार साहेब दालनात आल्याचं समजताच मी तातडीने खाली आलो. ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान म्हणून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
विरोधकांवर टीका करताना त्यांनी मिश्कील शैलीतही निशाणा साधला. “या भेटीमुळे काही जणांना मिरच्या झोंबल्या आहेत. एवढी पोटदुखी, जळजळ आणि मळमळ होत असेल, तर त्यावर औषधाची गरज आहे,” असा टोला त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आणखी उधाण आले असून, त्यांच्या टीकेला विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.