Shiv Sena-BJP Rift : फाटाफूट कराल तर… संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा, शिंदे सेना-भाजपात पुन्हा भडका
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत पक्षप्रवेशावरून तीव्र संघर्ष सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा दिला असून, फाटाफूट केल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास देसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा वाद उफाळून आला आहे. या पक्षप्रवेशानंतर शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना थेट इशारा दिला आहे.
शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर पलटवार करताना म्हटले आहे की, त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या बाहेर पडून संपूर्ण महाराष्ट्रात फिरावे आणि चांगले काम करावे. “आमच्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असा स्पष्ट इशारा शिरसाट यांनी दिला.
शिंदेसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी चव्हाण यांच्यावर प्रलोभने देऊन पदाधिकारी फोडण्याचा आरोप केला आहे. भाजपनेही “आम्ही एकाच्या बदल्यात चार फोडू” असा इशारा दिला आहे. फाटाफूट सुरू राहिल्यास भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढण्याची तयारी शिरसाट यांनी दर्शवली आहे.
