Gajanan Kirtikar : कीर्तिकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?
'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना तळमळीनं सांगेल एकत्र या. भविष्यात एकनाथ शिंदे यांना सोबत आणण्याचा प्रयत्न करेल. ऐकणं न ऐकणं हे त्यांचं काम आहे. मी ज्येष्ठ आहे. त्यामुळे त्यांना मी बोलू शकतो', असं कीर्तिकर म्हणाले होते.
गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर असल्याची चर्चा होतेय. दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्ष्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कीर्तिकर यांची भूमिका पक्षाला फायदा कमी पण नुकसान पोहोचवणारे जास्त असल्याची नेत्यांमध्ये भावना असल्याचे सूत्रांकडून समजतेय.
तर गजानन कीर्तिकर यांना वरिष्ठांकडून योग्य ती समज देण्यात यावी, अशीही पक्षातील प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. इतकंच नाही तर गजानन कीर्तिकर यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच गजानन कीर्तिकरांनी ठाकरे बंधूंसह एकनाथ शिंदे एकत्र येण्यावर एक विधान केलं होतं. ठाकरे बंधू जर एकत्र आलेत तर एकनाथ शिंदे की ठाकरे बंधू कोणासोबत राहणार? असा सवाल केला असता त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं. मात्र अडीच वर्षात शिंदेंनी मला काय दिलं? असा सवाल कीर्तिकरांनी केला आणि शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली.
