Harshwardhan Sapkal | तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने वापरलेल्या "गुंगी गुडिया" या शब्दप्रयोगावरून राज्यातील राजकारण तापले असून, या वादावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा शब्दप्रयोग मागे घेण्यास नकार देत, तो परिस्थितीनुसार योग्य असल्याचा दावा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने वापरलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दप्रयोगावरून राज्यातील राजकारण तापले असून, या वादावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा शब्दप्रयोग मागे घेण्यास नकार देत, तो परिस्थितीनुसार योग्य असल्याचा दावा केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “जर आम्ही सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटलं असेल, तर त्यांनी आपण दुर्गा आहोत हे कृतीतून सिद्ध करावं. अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी. अर्थखाते स्वतःच्या पक्षाकडे आणावे आणि लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, ज्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने सोशल मीडियावर संबंधित पोस्ट केली, त्या वेळी पत्रकार प्रश्न विचारत असताना एका लोकप्रतिनिधीने पत्रकारांना एकेरी भाषेत गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्या वेळी उपस्थित असूनही त्यांनी याविरोधात एक शब्दही उच्चारला नाही. लोकशाहीत पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. अशा वेळी मौन बाळगणे योग्य नाही. त्याच पार्श्वभूमीवर ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग करण्यात आला असून, तो योग्यच आहे,” असा दावा त्यांनी केला.
‘गुंगी गुडिया’ हा शब्द शिवी किंवा असंसदीय नसून केवळ एक वर्णन असल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, “सुनेत्रा पवार अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगतात. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत, अर्थखाते त्यांच्या पक्षाकडे नसल्याबाबत किंवा त्यांच्या पक्षाच्या अधिकारांवर होत असलेल्या कथित हस्तक्षेपाबाबत त्यांनी भूमिका मांडलेली दिसत नाही. सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीचा असा मुकेपणा योग्य नाही.”
दरम्यान, काँग्रेसच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यापूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार यांनीही या वादावर भूमिका मांडली होती. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून पुढे काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
