मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना..; मंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील वंदूर येथील एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांविषयी मोठं विधान केलं आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील वंदूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, मी जर भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन. सध्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळत असतील, तर मी ती रक्कम 1 लाख रुपये करेन. त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला अडथळे येत असल्याचेही नमूद केले.
मुश्रीफ पुढे म्हणाले, आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे, पण सध्याच्या परिस्थितीत काही अडचणी आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये खर्चावे लागत आहेत. काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. आम्ही यापूर्वी अनेकदा कर्जमाफी केली आहे, पण माझे याबाबत वेगळे मत आहे. कर्जमाफी जाहीर केली की शेतकरी कर्ज भरणे टाळतात, ज्यामुळे बँकांना अडचणी येतात. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे 38 हजार कोटी रुपये थकल्याचे मी ऐकले आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान दिले तर त्यांना कर्ज भरण्याची सवय लागेल. अन्यथा, सतत कर्जमाफी केल्याने थकबाकीमुळे बँका अडचणीत येतील आणि कर्ज प्रणाली कोलमडेल.
