Putins India Visit : रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसह 7 मंत्री 2 दिवस भारत दौऱ्यावर… पुतीन यांचा दौरा देशासाठी का महत्त्वाचा?

Updated on: Dec 04, 2025 | 2:14 PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यासाठी रवाना होणार असून संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पुतीन दिल्लीत पोहोचणार आहे. पुतीन हे दोन दिवस भारत दौऱ्यावर असणार आहे. पुतीन यांच्यासह रशियाचे ७ मंत्री भारत दौऱ्यावर असणार आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून २३ व्या भारत आणि रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी साडेसहा वाजता पुतीन नवी दिल्लीत पोहोचतील. हा दौरा दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध दृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेने कच्च्या तेलाच्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिकेनंतर रशियाने भारताला मदतीचे आश्वासन दिले होते, त्यामुळे हा दौरा अधिक महत्त्वाचा ठरतो.

दौऱ्यादरम्यान क्रूड ऑइल करार, संरक्षण करार आणि मुक्त व्यापारासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. संरक्षणाच्या बाबतीत, एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली, भविष्यातील एस-५०० प्रणाली, ब्रह्मोस आणि नौदलातील एकत्रित करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतीन यांच्या भेटीसाठी राजधानीत जय्यत तयारी करण्यात आली असून, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले आहे. उद्या हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय करार होणार आहेत. चार वर्षांनंतर पुतीन यांचा हा भारत दौरा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. पुतीन यांच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे टॉप कमांडर, स्नायपर, ड्रोन, जॅमर आणि एआयच्या माध्यमातून देखरेख करणारी यंत्रणा असलेले पाचस्तरीय सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे.

Published on: Dec 04, 2025 02:14 PM