IndiGo Flight Delay: इंडिगोच्या दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये 250 हून अधिक प्रवासी अडकले, दिल्ली विमानतळावर एकच गोंधळ, झालं काय?
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये अडीचशेहून अधिक प्रवासी चार तासांपेक्षा जास्त काळ अडकले. प्रवाशांना कोणतीही माहिती न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. वृद्ध, लहान मुले आणि मधुमेहाच्या रुग्णांसह अनेकांना पाणी आणि अन्नही पुरवले नाही. व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या दिल्ली ते पुणे प्रवास करणाऱ्या फ्लाईटमधील अडीचशेहून अधिक प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. हे प्रवासी चार तासांहून अधिक काळ विमानात अडकले होते. त्यांना फ्लाईट उड्डाण न होण्यामागील कारण किंवा इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील ३५ जणांचा एक गट दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी आठ वाजता विमानतळावर पोहोचला होता. त्यांना सुरुवातीला सकाळी १० वाजता उड्डाणाची वेळ दिली होती, त्यानंतर ती साडेदहा वाजता करण्यात आली. अनेक वेळा गेट नंबर बदलल्यानंतर, अखेरीस दुपारी १२ वाजता त्यांना विमानात प्रवेश देण्यात आला. मात्र विमानात बसल्यानंतरही अडीच तास होऊन गेले, तरी फ्लाईटने उड्डाण केले नाही.
प्रवासी राजेश लोहार यांनी फोनवरून सांगितले की, विमानाच्या आतमध्ये एअर होस्टेस किंवा कॅप्टन यांच्याकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती. व्यवस्थापनाशी बोलणे चालू आहे एवढेच उत्तर दिले जात होते. विमानाच्या दरवाज्यातून बाहेरही पडू दिले जात नव्हते. विमानात अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींचा समावेश होता. एका मधुमेहाच्या रुग्णाचे इन्सुलिन सामान ठेवलेल्या कार्गोमध्ये होते आणि त्यांना इन्सुलिनची तातडीने आवश्यकता होती. लहान मुलांनाही अन्नाची समस्या भेडसावत होती, कारण त्यांना कोणतेही अन्न किंवा पाणी पुरवले गेले नव्हते.
