आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती…; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
राज्यात सध्या सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना, आणखी काही आमदार आणि खासदार पक्षांतर करू शकतात, अशा चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर बोलताना जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. “ज्यांना आमदार व्हायचे आहे त्यांनी काळजी करू नये. देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे. ती शक्ती सर्वांचे समाधान करणारी आहे,” असे ते म्हणाले.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांच्या विजयाच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळातील एक आठवणही सांगितली.
“लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतुलबाबा आणि मनोजदादा यांना तुम्ही विधानसभेत जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आम्ही चौघेही आमदार झालो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी देवाभाऊ ठामपणे उभे राहतात,” असे गोरे यांनी नमूद केले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर गोरे यांच्या विधानाकडे विशेष लक्ष वेधले जात असून, त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
दरम्यान, आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असताना, जयकुमार गोरे यांच्या “दैवी शक्ती” या वक्तव्याने राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे.