कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
कांदिवली लिंक रोडवर मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केले. यामुळे सुमारे 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. आरटीओकडून लादण्यात येणाऱ्या पंचवीस हजार रुपयांच्या दंडावर रिक्षाचालकांनी आक्षेप घेतला, ज्यामुळे युनियनने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील कांदिवली लिंक रोडवर मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे 20 मिनिटे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अमराठी रिक्षाचालकांनी एकत्र येऊन रस्ता रोको केला.
आंदोलनादरम्यान, रिक्षाचालकांनी आपला निषेध व्यक्त केला. एका रिक्षाचालकाने सांगितले की, “आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही, पण आमच्या युनियनने या प्रकरणात उभे राहिले पाहिजे. मराठी भाषेच्या वापरावरून आरटीओ रिक्षाचालकांना पंचवीस-पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावत आहे. युनियनने पुढे येऊन भाषा वापराबाबत भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला एकाएकी मराठी बोलायला सांगितले तर ते लगेच कसे जमेल.” त्यांचा विरोध आरटीओच्या या दंडात्मक कारवाईला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षाचालकांनी सांगितले की, आजच्या संपाची घोषणा युनियनने केलेली नसून, हे रिक्षाचालक स्वखुशीने रस्त्यावर उतरले आहेत.
यामुळे रस्त्यावर पॅसेंजर थांबलेले असतानाही अनेक रिक्षाचालकांनी रिक्षा थांबवून आंदोलन केले. टीव्ही ९ मराठीने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरातील ही दादागिरी मराठी भाषेच्या सक्तीविरोधात होती.
