टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तिरी गर्दी केली आहे. पवित्र स्नान करून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दुष्काळाचे सावट असूनही, भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि श्रद्धेची ओढ स्पष्ट दिसत आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीचा जागर अनुभवायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी चंद्रभागेच्या तिरी गर्दी केली आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांनी पवित्र स्नान केले. त्यानंतर पुंडलिकाचे दर्शन घेऊन नामदेव पायरीच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करत पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरतेने प्रस्थान केले.
यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने काहीशी गर्दी कमी असली, तरी आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर पांडुरंगाच्या भेटीची ओढ आणि आनंद स्पष्ट दिसत आहे. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर वर्षभराची प्रेरणा मिळते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. खांद्यावर भगवा पताका, कपाळावर अबीर बुक्का आणि मुखात विठ्ठल नामाचा गजर करत ही वारकरी परंपरा पंढरपुरात उत्साहात सुरू आहे.
