Kolhapur Madhuri Elephant : माधुरी हत्तीण परतणार की नाही? सरकारच्या बैठकीय काय होणार निर्णय?
कोल्हापूरहून गुजरातला गेलेल्या माधुरी हत्तीणीबद्दल आज एक सरकारी बैठक होणार आहे. कोर्टाचा निर्णय आणि जनभावना याच्यातून सरकारला सुवर्णमध्य काढायचं आहे. तर दुसरीकडे गुजरातच्या वनतारानं याबद्दल काय स्पष्टीकरण दिलं आणि पेटाचा अजून एक प्रस्ताव का चर्चेत आलाय?
जैन मठातील माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरात विशाल मोर्चा निघाला. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसारचा पाळलेला हत्ती खोटे अहवाल देऊन गुजरातला नेल्याचा आरोप करत हत्तीण परत देण्याची मागणी झाली. हा वाद सुरू असतानाच पेटा या प्राणीमित्र संघटनेने अजून हत्ती असलेल्या इतर तीन मठांना नोटीस पाठवल्या. कोल्हापूर कर्नाटक सीमेलगत जैन लिंगायत समाजासह अनेक धार्मिकांचे मठ आहेत. इथल्या अनेक मठांच्या मान्यतेनुसार हत्तीला धार्मिक महत्त्व असल्यामुळे तिथे शेकडो वर्षापासून हत्ती पाळले जात आहेत. मात्र या मठातील हत्तींची काळजी कशी घेतली जाते? त्यांना आरोग्याच्या काही समस्या आहेत का? हत्तींचा अन्न आणि निवारेची सोय काय? तसे तपशील देण्याचं पेटाने म्हटले आहे.
कोल्हापूरच्या नांदणी गावातल्या जैन मठाच्या हत्तीणीची हेळसांड होते म्हणून ती गुजरातच्या अंबानींच्या वनतारात गेली. त्यानंतर आता पेटाने बेलगावातल्या श्री मादाचार्य शांतीसागर दिगंबर जैन मठ, श्री सिद्धेश्वर मठ आणि श्री गुरु महांतेश्वर स्वामी टेंपल या तीनही मठांमध्ये हत्ती बाबत तपशील मागवला आहे. आरोग्याच्या हेळसांडीबरोबरच कोल्हापूरच्या जैन मठातील हत्तीणीकडून भीक मागितली गेल्याचेही आरोप केले जात आहेत. मात्र स्थानिक या दाव्यांना पूर्णपणे खोटं ठरवताहेत. राजू शेट्टींच्या दाव्यानुसार ज्या जैन मठाकडे १४०० एकर जमीन आहे, ज्या मठाच्या अधिपत्याखाली ७४३ गावं येतात आणि ज्या लोकांनी हत्तीणीला महादेवीचा दर्जा दिला आहे, तिचा वापर भीक मागण्यासाठी झाल्याचा आरोप फेटाळला आहे.
