Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Jul 28, 2026 | 3:20 PM

राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या यादीनंतर आता दुसऱ्या यादीत लाखो शेतकऱ्यांचा समावेश होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 533 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या यादीनंतर आता दुसऱ्या यादीत लाखो शेतकऱ्यांचा समावेश होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 533 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कर्जमाफी योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असून, कागदपत्रे पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची नावे पुढील याद्यांमध्ये समाविष्ट केली जातील, असं त्यांनी सांगितलं. भरणे म्हणाले की, कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसणाऱ्या आणखी सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एखाद्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची नावे टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केली जातील आणि त्यानंतर लाभ तातडीने दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्य सरकार या योजनेसाठी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून, पात्र शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जाची माफी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यादीत किंवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेताना अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी पेरणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाच्या परिस्थितीनुसार शेतकरी पेरणी करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची घेतलेल्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दत्तात्रय भरणे म्हणाले की, “शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची भेट घेणं किंवा आशीर्वाद घेणं यात काहीही चुकीचं नाही.”

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना त्यांनी, बाधितांना शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचंही सांगितलं.

 

Published on: Jul 28, 2026 3:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us