Maharashtra Flood : शेतकऱ्यांचा रोष उमटला केला एकच सवाल अन् सदाभाऊंनी घेतला काढता पाय, सोलापुरात घडलं काय?

Maharashtra Flood : शेतकऱ्यांचा रोष उमटला केला एकच सवाल अन् सदाभाऊंनी घेतला काढता पाय, सोलापुरात घडलं काय?

| Updated on: Sep 28, 2025 | 11:11 AM

पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना माढा तालुक्यातील उंदरगाव येथे त्यांच्या आठ दिवसांच्या अनुपस्थितीबद्दल जाब विचारला. पिकांचे आणि घरांचे नुकसान पाहण्याऐवजी केवळ बांधावरून फोटो काढल्याबद्दल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. संतप्त ग्रामस्थांच्या रोषामुळे खोतांना माघार घ्यावी लागली.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले नेते सदाभाऊ खोत यांना संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुराचे पाणी शेतात घुसून आठ दिवस झाले असताना, आपण एवढे दिवस कुठे होतात, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी खोत यांना विचारला. गेल्या आठ दिवसांपासून शेतांमध्ये नदीचे पाणी साचले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. अशा परिस्थितीत सदाभाऊ खोत एवढे दिवस गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.

शेतकऱ्यांनी त्यांना केवळ बांधावरून फोटो काढून आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन जाऊ नका, तर शेतात आणि घरात शिरलेल्या पाण्याची पाहणी करा, अशी मागणी केली. ग्रामस्थांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर सदाभाऊ खोत यांना गाडीत बसून निघून जावे लागले. या घटनेनंतर शेतकरी नेत्यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे की, संकटाच्या काळात मदत करण्याऐवजी केवळ पर्यटन करणाऱ्या नेत्यांना जनता यापुढे कदापि सहन करणार नाही.

Published on: Sep 28, 2025 11:11 AM