Pune Election : हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला… पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत चाललंय काय?

| Updated on: Jan 02, 2026 | 12:33 PM

पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत उमेदवारी अर्जावरून नाट्यमय घडामोड समोर आली आहे. एकाच वॉर्डात दोघांना एबी फॉर्म मिळाल्याने संतप्त उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज फाडून त्याचे तुकडे गिळले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैद्यकीय तपासणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे उमेदवार पळवण्याच्या घटना आता जुन्या झाल्या आहेत. पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत एका अत्यंत धक्कादायक प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुण्याच्या सहकार नगरमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिंदेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म चक्क फाडून गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे प्रभाग क्रमांक ३६ मधून शिवसेनेने (शिंदे गट) मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे या दोघांनाही एबी फॉर्म दिले होते. मच्छिंद्र ढवळे यांनी आपला उमेदवारी अर्ज आधीच दाखल केला होता. त्यानंतर उद्धव कांबळे आपला अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचले असता, त्यांना सांगण्यात आले की, अधिकृत एबी फॉर्मसह अर्ज आधीच दाखल झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कांबळेंनी मच्छिंद्र ढवळे यांचा अधिकृत एबी फॉर्म पाहिला आणि तो फाडून टाकला. इतकेच नाही, तर ते फाडलेले अर्जाचे तुकडे घेऊन पळून गेले आणि पळून जात असताना त्यांनी ते तुकडे गिळल्याचा आरोप आहे.

Published on: Jan 02, 2026 12:33 PM