महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून, ही जागा भाजपकडे गेली आहे. महायुतीमध्ये झालेल्या निर्णयानंतर पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही भाजप लढणार आहे. अमरावती शिवसेना आणि संभाजीनगर राष्ट्रवादीला मिळालं आहे. शिंदे गटाचे इच्छूक उमेदवार मंगेश चिवटेंना मात्र उमेदवारी नाकारण्यात आली.
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे निश्चित झाला आहे. या मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच संपुष्टात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या करारानुसार, पुणे शिक्षक मतदारसंघासोबतच पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही भाजप लढवणार आहे. दुसरीकडे, अमरावतीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असून, संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे.
महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी यावर सहमती दर्शवली आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटेंना मात्र उमेदवारी मिळाली नाही. बच्चू कडूंनी चिवटेंना पाठिंबा दर्शवला होता, तरीही त्यांना संधी नाकारण्यात आली. भाजपने या मतदारसंघासाठी १५ संभाव्य उमेदवारांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांकडे सादर केली असून, लवकरच अंतिम नावाची घोषणा दिल्लीतून केली जाईल.
