ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. ममता बॅनर्जींनी टीएमसीच्या नावाने चिन्हाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला अटक झाल्याने राजकीय सूडबुद्धीचा आरोप काँग्रेस आणि टीएमसीने केला आहे. या मुद्द्यांवरून काँग्रेस देशभरात वातावरण निर्मिती करणार असून, हाय कमांड अधिक सक्रिय झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून, ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टीएमसीच्या नाव आणि चिन्हाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचदरम्यान, काँग्रेसने पश्चिम बंगालमधील या घडामोडींवर देशभरात वातावरण निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, काँग्रेसचे हाय कमांड बंगालच्या मुद्द्यावरून अधिक सक्रिय झाले असून, निवडणूक यंत्रणेवर निशाणा साधण्याची तयारी करत आहे. नंदीग्राम पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. टीएमसीच्या उमेदवार संचिता प्रधानडे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर अर्ज मागे घेतला. तर, काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर ही अटक झाली आहे. या अटकेवरून ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी दोघांनीही भाजपवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप करत लोकशाहीच्या हत्येचा हल्लाबोल केला आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.
