मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर…
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. पूर्वी आंतरवाली सराटीत आंदोलन होणार असल्याचे जरांगेंनी म्हटले असले तरी, आता मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परवानगी मिळवण्यासाठी त्यांचे सहकारी प्रयत्न करत असून, मुंबईतील आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडे अधिकृत परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे २९ ऑगस्टचे आंदोलन आंतरवाली सराटी येथे शांततेत होईल असे म्हटले होते. परंतु, त्यांनी “कधीही काहीही निर्णय होऊ शकतो, गनिमी कावा होऊ शकतो,” असे सूचक विधानही केले होते.
आता मुंबईत आंदोलनासाठी अर्ज केल्याने, २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन मुंबईत होणार की आंतरवाली सराटी येथे, याबद्दल एक अनिश्चितता निर्माण झाली आहे. जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे, पांडुरंग तारोख आणि ॲडव्होकेट आशिष गायकवाड यांच्यामार्फत मुंबईत आंदोलनासाठी परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वाक्षरी असलेला हा अर्ज आझाद मैदान पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्येच हे आंदोलन करण्यासाठी सध्या तयारी सुरू आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतूनच मोठा लढा उभारण्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींमुळे शासनावरही दबाव येण्याची शक्यता आहे.
