Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर… जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दहावा दिवस असून, त्यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंतरवली सराटीत उपस्थित मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे अंतरवली सराटीत दाखल झाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दहावा दिवस असून, त्यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंतरवली सराटीत उपस्थित मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे अंतरवली सराटीत दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशी विनंतीही दानवेंनी केली.
दरम्यान, जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय पथक अंतरवलीत ठाण मांडून आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांची टीम त्यांना उपचार घेण्याचा आग्रह करत आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती मराठा आंदोलक अशोक काळकुटे यांनी दिली. काल सायंकाळीही त्यांची प्रकृती अधिक खालावली होती.
अंबादास दानवे यांनी सरकारला जरांगे यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. “जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत, त्या ताबडतोब मान्य करण्याची गरज आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेणं आवश्यक आहे,” असं दानवे म्हणाले. तसंच मागण्या त्वरेने मान्य झाल्या नाहीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही दानवेंनी दिला. “त्वरेने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विस्फोट होऊ शकतो आणि त्याला जबाबदार कोण आहे, हे सांगायची गरज नाही,” असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
कुणबी प्रमाणपत्र मिळताना अडचणी येत असल्याचा तसेच काही जणांची प्रमाणपत्रं रद्द झाल्याचा मुद्दाही दानवेंनी उपस्थित केला. यामुळे हे जाणीवपूर्वक होत आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने अंतरवली सराटीत मराठा समाजाची मोठी गर्दी झाली असून, सरकारने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
