Maratha Andolan Jalna | मराठा आंदोलनात धक्कादायक घटना! अंतरवाली सराटीत आंदोलकाने जीव गमावला; नेमकं घडलं काय?
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनादरम्यान दशरथ रायकर (बीड, धारूर) या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. त्यांच्या निधनानंतर बीड, परभणी, नांदेड आणि धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याचे रहिवासी असलेले मराठा आंदोलक दशरथ रायकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
दशरथ रायकर हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यासाठी ते अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. या घटनेने मराठा समाजात तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावात मराठा आंदोलकांनी टायर पेटवून निषेध व्यक्त केला, तर बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडसह परभणी, नांदेड, धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे, ज्यामुळे आंदोलनाला अधिक धार आली आहे.
